दैनंदिनीसाठी साधा-सोपा अनुप्रयोग

आता नवीन वर्षं सुरु होणार आहे, तेंव्हा दैनंदिनी लिहायला सुरुवात करण्यास हरकत नाही. पण आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की, ‘मूळात दैनंदिनी लिहायची गरजच काय?’. प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी हा ‘आपण कुठून आलो आहोत?’ आणि ‘आपल्याला कुठे जायचे आहे?’ याची चाचपणी करत करतो. आयुष्य हा देखील एक प्रवास आहे. ‘आपण कुठून आलो आहोत?’ हे जर आपल्याला माहित नसेल, तर ‘आपल्याला कुठे जायचे आहे?’ यासंदर्भात नेमका अंदाज येत नाही. तेंव्हा आपल्या आयुष्यरुपी प्रवासाचा अंदाज घेण्यासाठी दैनंदिनी लिहिणे महत्त्वाचे आहे. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अगदी अट्टाहास करण्याची आवश्यकता नाही. पण जेंव्हा कधी वेळ असेल, अगदी सहजशक्य असेल, तेंव्हा मात्र दैनंदिनी लिहायला हरकत नाही. त्यासाठी तसाच एक साधा-सोपा अनुप्रयोगही उपलब्ध आहे.

दैनंदिन घडामोडी सहजतेने लिहिणे

आज मी प्रथमच अशा एका अनुप्रयोगाची माहिती देत आहे, जो अगदी पूर्णतः मोफत नाहीये, पण गूगल प्ले स्टोअरवर तो सध्या केवळ दहा रुपयांना उपलब्ध आहे. यासंदर्भात कदाचित आपल्याला ‘अनुप्रयोग कसा विकत घ्यावा?’ हा लेख वाचायला आवडेल. तर दैनंदिनी संदर्भातील या अनुप्रयोगाचे नाव DayGram असे आहे. हा एक अतिशय साधा-सोपा अनुप्रयोग आहे. याच्या सहाय्याने दैनंदिनी लिहिणे हे अगदी सहजशक्य होते.

DayGram
DayGram हा दैनंदिनी लिहिण्यासाठी एक साधा-सोपा अनुप्रयोग आहे

हा अनुप्रयोग आत्तापर्यंत १० हजारांहून अधिक लोकांनी आपल्या स्मार्टफोनवर घेतला असून १ हजारहून अधिक लोकांनी मिळून त्यास ५ पैकी ४.६ गुण दिलेले आहेत. दिवसभरातील घडामोडी, विचार दिवसअखेर दैनंदिनीत एकत्रितपणे लिहिणे हे काहीवेळी कंटाळवाणे ठरु शकते. तेंव्हा दिवसभरातील घटनाक्रम, विचार आपल्या स्मार्टफोनवर अधूनमधून लिहित राहणे हा DayGram या अनुप्रयोगामागील मूळ उद्देश आहे. हा अनुप्रयोग लगेचच उघडला जातो. त्यानंतर आपल्या नोंदी या त्यावर वेळेनुसार झटपट जतन करुन ठेवता येतात. आपण लिहिलेल्या नोंदी गहाळ होऊ नयेत, म्हणून आपण ड्रॉपबॉक्सवर त्या नोंदींचा बॅकअप घेऊ शकतो.

तेंव्हा येत्या नवीन वर्षापासून आपल्या स्मार्टफोनवर जमेल तसं दैनंदिनी लिहिण्यास सुरुवात करावी! त्यादिशेने प्रयत्नतरी करुन पहावा! जेणेकरुन स्वतःलाच स्वतःची आयुष्यरुपी वाटचाल उमगण्यास मदत होईल.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.