स्मार्टफोनवरील फोटोंचा गूगलवर बॅकअप

स्मार्टफोन हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. महत्त्वपूर्ण प्रसंग किंवा असाच एखादा आनंदाचा क्षण स्मार्टफोनच्या कॅमेरॅत कैद होतो, तेंव्हा तो कायम आपल्यासोबत रहावा अशी अपेक्षा असते. पण अनेकदा या ना त्या कारणाने आपल्यावर स्मार्टफोनमधील फोटो गमावण्याची वेळ येते. तेंव्हा ही गोष्ट गृहित धरुन स्मार्टफोनमधील फोटोंचा बॅकअप घेणे गरजेचे ठरते. क्लाऊड स्टोरेजच्या माध्यमातून आपण असा बॅकअप अगदी सहजतेने घेऊ शकतो. पण सहसा क्लाऊड स्टोरेजलाही मेमरीची एक मर्यादा असते. उदाहरणार्थ, ड्रॉपबॉक्सवर आपणास केवळ २ जीबी इतकीच जागा उपलब्ध होते. त्यामुळे क्लाऊडवर अगदी कितीही छायाचित्रे, चित्रफिती साठवायचे असतील, तर काय करता येईल? त्यासाठी गूगलची मदत घ्यावी लागेल.

गूगल फोटोज्‌ – क्लाऊडवर अमर्याद फोटो

गूगल फोटोज्‌ (Google Photos) हा गूगलचा एक मोफत अनुप्रयोग (Application) आहे, जो स्मार्टफोनवरील गॅलरीप्रमाणे काम करतो. या अनुप्रयोगात आपल्याला स्मार्टफोनवरील सर्व छायाचित्रे आणि चित्रफिती दिसतात. पण केवळ छायाचित्र वा चित्रफीत पाहणे एव्हढ्यापुरताच या अनुप्रयोगाचा वापर मर्यादित नाही. तर तो आपल्या स्मार्टफोनवरील छायाचित्रांचा व चित्रफितींचा मोफत बॅकअप सुद्धा घेऊ शकतो.

आता हा अनुप्रयोग बॅकअप घेतो म्हणजे नक्की काय करतो? तर तो आपल्या स्मार्टफोनवरील छायाचित्रे गूगलच्या photos.google.com या संकेतस्थळावर इंटरनेटच्या सहाय्याने अपलोड करतो. अपलोड केलेले छायाचित्र, चित्रफीत आपल्या व्यतिरिक्त इतर कोणीही पाहू शकत नाही. पण आपली जर ईच्छा असेल, तर आपण स्वतःहून ते मित्रपरिवारासोबत वाटू (Share) शकतो. अशाप्रकारे आपण कितीही छायाचित्रे गूगलच्या क्लाऊडवर साठवू शकतो!

गूगल फोटोज्‌
गूगल फोटोज्‌च्या सहाय्याने क्लाऊडवर अमर्याद बॅकअप घेता येतो

Google Photos या अनुप्रयोगाच्या Settings अंतर्गत येणार्‍या Backup & sync या विभागात बॅकअप संदर्भातील काही पर्याय आहेत. छायाचित्र क्लाऊडवर अपलोड करत असताना कोणते इंटरनेट वापरले जावे? ते आपणास तिथून ठरवता येईल. Over Wi-Fi only या पर्यायाची निवड केल्यास केवळ वाय-फायच्या सहाय्याने छायाचित्र क्लाऊडवर साठवले जाईल. पण Over Wi-Fi or use mobile network हा पर्याय निवडल्यास क्लाऊड बॅकअपसाठी वाय-फाय आणि मोबाईल नेटवर्क अशा दोहोंचाही वापर केला जाईल. बाहेर फिरत असताना काढलेले छायाचित्र लगेच क्लाऊडवर सुरक्षित करायचे असेल, मोबाईल नेटवर्क या पर्यायाची निवड करावी. आपला स्मार्टफोन जर कधी हरवला, तर कदाचित या सोयीचा उपयोग होऊ शकतो.

स्मार्टफोनवरील कोणत्या फोल्डर्सचा बॅकअप घ्यायचा? आणि कोणत्या नाही? ते या अनुप्रयोगास सांगता येते. अशाने केवळ आपण नमूद केलेल्या फोल्डरमधील छायाचित्रे क्लाऊडवर जमा हो्तात. Roaming, While charging only असे तत्संबंधी काही इतरही पर्यायही Backup & sync या विभागात देण्यात आलेले आहेत.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.